इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आता फारसा लाईमलाईटमध्ये नसलेला अभिनेता दीपक तिजोरी याने एका निर्मात्याविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे, तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रारही केली आहे. या निर्मात्याने आपली अडीच कोटींची फसवणूक केल्याचे तिजोरीचे म्हणणे आहे.
‘थ्रिलर’ चित्रपटाचा सह-निर्माता मोहन नाडर याच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीनं एका चित्रपट निर्मात्यावर 2.6 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दीपकनं मुंबईमधील अंबोली पोलीस स्टेशन येथे 15 मार्च रोजी ही तक्रार दाखल केली. दीपकनं जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी मोहन नाडरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पैसे परत न केल्यानं केली तक्रार
लंडनमधील शूटिंग लोकेशनसाठी मोहन नाडरने पैसे घेतले होते. ते त्याने अजूनही परत केलेले नाहीत, असे दीपक यांनी पोलिसांना सांगितले. आंबोली पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये दीपक आणि मोहन नाडरने ‘टिप्सी’ नामक चित्रपटासाठी करार केला होता. त्यावेळी नाडरने दीपक तिजोरीकडून पैसे घेतले होते, ते परत मागितल्यावर त्याने दीपक तिजोरीला एकापाठोपाठ एक चेक दिले, मात्र ते बाऊन्स झाले. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1637657310372802560?s=20
Bollywood Actor Deepak Tijori Duped 2.6 Crore FIR