इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कौंटुबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. सात दशकांचा हा प्रवास यंदा एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाने पूर्ण करण्याचा प्रॉडक्शनचा विचार होता. याच अनुषंगाने राजश्री प्रॉडक्शनने ‘उंचाई’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणला. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने चांगले यश मिळविले. याचनिमित्ताने बोमन इराणी आणि राजश्री प्रॉडक्शन यांच्याविषयी आता अनेक बाबी समोर आल्या आहेत.
राजश्री प्रॉडक्शनची अमृत महोत्सवी वाटचाल आणि ‘उंचाई’ हा त्यांचा साठावा चित्रपट असा वेगळा योग जुळून आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्याबरोबरीने राजश्री प्रॉडक्शनशी फारसे संबंध न आलेल्या अनेक कलाकारांनी एकत्र काम केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता बोमन इराणी, अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका, डॅनी डेंझोपा, नफीसा अली आणि परिणीती चोप्रा यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. राजश्री प्रॉडक्शन आणि अभिनेते अनुपम खेर यांचे नाते खास आहे. अनुपम खेर यांनी ३८ वर्षांपूर्वी राजश्री प्रॉडक्शनसोबत त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
बोमन इराणी या प्रोडक्शनचा भाग कसे झाले? याचा किस्सा अनुपम यांनी यावेळी सांगितला. सूरज बडजात्यांनी बोमन यांना चित्रपटासाठी विचारले असता काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनुपम खेर यांनी बोमन यांना फोन केला आणि मैत्रीच्या नात्याने काही गोष्टी सांगितल्या. या चित्रपटाचा भाग झालास तर तू इतिहासाचा भाग होशील हे विसरू नकोस, असे अनुपम यांनी सांगितले. आणि अनुपम यांच्या त्या शब्दांखातर लगेचच बोमन इराणी यांनी सूरज बडजात्यांना फोन करून चित्रपटात भूमिकेसाठी होकार दिला. दिग्दर्शक सूरज बडजात्यांबरोबर अनुपम खेर यांचा हा पाचवा चित्रपट आहे.
कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती करणे ही राजश्री प्रॉडक्शनची खासियत आहे. आतापर्यंत ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. ‘उंचाई’चे या वर्षाच्या सुरुवातीला मुख्य चित्रिकरण पूर्ण करण्यात आले आहे. नेपाळ, दिल्ली, मुंबई, आग्रा, लखनौ आणि कानपूरमध्ये या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण करण्यात आले.
Bollywood Actor Boman Irani Entry in Rajashri Production