इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिग बी अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे शहेनशाह म्हणवले जातात. अत्यंत मनमोकळ्या स्वभावसह, दिलदार, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. याशिवाय कामातला त्यांचा वक्तशीरपणा, कामाप्रती समर्पण हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे बिग बी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमके काय घडले?
एका अनोळखी माणसासोबत बाईक प्रवास करतानाचा अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. चित्रीकरणासाठी निघालेल्या अमिताभ यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. चित्रीकरणाला उशीर होऊ नये यासाठी त्यांनी अखेर गाडीतून उतरून लिफ्ट घेतली. तोच हा त्यांचा बाईकवरचा फोटो. सुरुवातीला त्यांचे कौतुक झाले. पण हळूहळू सोशल मीडियावर लोकांचे लक्ष त्यांच्या हेल्मेट न घालण्याकडे गेले आणि बिग बींवर टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि तक्रारींचा प्रचंड पूर आल्याने मुंबई पोलिसांना या प्रकरणी प्रतिक्रिया द्यावी लागली.
विनाहेल्मेट प्रवासाबाबत काय म्हणाले बिग बी
अमिताभ एका ऑन लोकेशन शूटदरम्यान मुंबईच्या रस्त्यावर होते. त्यांनी सांगितले की तो रविवार होता… बॅलार्ड इस्टेटच्या एका गल्लीत चित्रीकरणाची परवानगी घेण्यात आली होती. रविवारी सर्व कार्यालये बंद असल्याने तसेच तेथे कोणतीही रहदारी नसल्याने ही मंजुरी घेण्यात आली होती. यात नियमांचा भंग केला नव्हता. वास्तविक, चित्रपटाच्या क्रू मेंबरच्या बाईकवर बसून त्यांनी ही मस्करी केली. ते म्हणाले की, मी तिथून कुठेही गेलो नाही, पण वेळ वाचवण्यासाठी मी प्रवास केल्याची जाणीव करून दिली.
तथापि, त्यांच्या ब्लॉगमध्ये, बिग बी म्हणतात, जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते नक्कीच बाइक चालवतील आणि त्यावेळी हेल्मेट घालून आणि सर्व नियमांचे पालन करूनच प्रवास करतील.
Bollywood Actor Amitabh Bachchan Bike Ride Helmet