मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. अक्षयकुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकदा त्याला टीकेचा सामना करावा लागला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने ट्विटरवर एक ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बऱ्याचदा नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रोलर्स निशाण्यावर येत होता. देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारवर कॅनडाचा नागरिक असल्याच्या मुद्यावर बरेचजणांनी टीकाही केली. त्यावेळेस अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला होता. या खुलाश्यात त्याने सांगितले होते की, माझे सलग १४ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे आपली कारकीर्द संपली असून आता आयुष्य जगण्यासाठी आणखी काही वेगळी कामे करावी लागणार असल्याचे वाटत होते. माझा एक जवळचा मित्र कॅनडात राहतो. त्यानेच मला कॅनडात येण्यास सांगितले. आपण येथे काही व्यवसाय करू असे त्याने सांगितले. त्यानंतर मी कॅनडाचा पासपोर्ट स्वीकारला.
माझे बॉलिवूडमधील करिअर संपले असे वाटल्यामुळे मी तो निर्णय घेतला. सुदैवाने माझ्या १५ व्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर पासपोर्ट बदलण्याबाबत विचार केला नसल्याचे अक्षयने त्यावेळेस सांगितले. त्यानंतर आता सर्व टोलर्सला स्वातंत्रदिनी त्यांनी उत्तर दिले आहे. फक्त एक फोटो पोस्ट करुन त्याच्यावर कॅप्शन टाकली आहे. मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.
Akshay Kumar got Indian citizenship
Bollywood Actor Akshay Kumar Citizenship Post
Indian Independence Day