इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडस्ट्रीतील तीन सर्वात मोठ्या खानमध्ये गणना केल्या जाणाऱ्या बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा असून, त्याच्या नवीन चित्रपटाची वाट त्यांच्याकडून पाहिली जात असते. आता चाहते त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची चर्चा सध्या रंगली असून, आमिर खानने एकदा हा चित्रपट व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्याची इच्छा नव्हती. एका न्यूज शोमधील संवादादरम्यान आमिर खानने याचा खुलासा केला.
आमिर खान म्हणाला की तो खूप स्वार्थी आहे आणि त्याने आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आहे. आमिर खानला आपली चूक लक्षात आल्यावर त्याने सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, आमिर खानला असे वाटले की, सिनेमामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबातील अंतर वाढले आहे. त्यामुळेच त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याने जाऊन आपल्या कुटुंबियांना सांगितले की, तो यापुढे चित्रपट करणार नाही. चित्रपटात काम करणार नाही आणि चित्रपटांची निर्मितीदेखील करणार नाही. चित्रपट करण्यापेक्षा तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवेल, असे त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे आमिर खाननेही त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढे बोलताना आमिर खान म्हणाला, ‘मला वाटले की लोकांना हा लाल सिंग चड्ढाचा मार्केटिंग स्टंट वाटेल, म्हणून मी गप्प बसलो. माझ्या चित्रपटांमध्ये ३ – ४ वर्षांचे अंतर असते. त्यामुळे लालसिंग चड्ढानंतर काय असा प्रश्न सध्या कोणीही विचारत नाही. म्हणून मी शांत आहे. गेल्या ३ महिन्यांपासून त्याने कोणतेही काम केलेले नाही आणि फक्त मुलगी आयरा खानच्या मानसिक आरोग्याशी संबंधित फाउंडेशनमध्ये तो काम करत आहे.
मग निर्णय कसा बदलला?
आमिर खानचा हा निर्णय केवळ त्याच्या कुटुंबामुळेच बदलला. आमिर खान म्हणाला, माझ्या मुलांनी आणि किरणनी मला सांगितलं की मी चुकीचा विचार करत होतो. माझ्या मुलांनी मला सांगितले की मी एक टोकाचा विचार करणारी व्यक्ती आहे आणि मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन शोधल्यास ते चांगले होईल. या टप्प्यात किरणने मला खूप मदत केली. माझा निर्णय ऐकून ती रडू लागली. किरणने सांगितले की, माझे कॅमेऱ्याशी नाते आहे आणि त्याशिवाय ती माझी कल्पनाही करू शकत नाही. म्हणून पुन्हा चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहण्याचा निर्णय त्याने घेतला.