इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आपला हा शेवटचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून आमिर खान घरातच वेळ घालवत होता. मात्र, आता तो विपश्यनेसाठी नेपाळला पोहोचला आहे.
सलग फ्लॉप चित्रपट
२०२२मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चढ्ढा’ हा त्याचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. खरं तर हा चित्रपट बिग बजेट होता. मात्र, तो बजेट देखील वसूल करू शकला नाही. यापूर्वी आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही काही खास कामगिरी करू शकला नव्हता. अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफसह असे बडे कलाकार असूनही हा चित्रपट लोकांना फारसा आवडला नव्हता. सतत फ्लॉप चित्रपट देऊन थकलेला आमिर खान आता ब्रेकवर गेला आहे, आणि तोही थेट अध्यात्मिक ब्रेकवर.
बॉयकॉट ट्रेंड
‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. सलग सुपरहीट चित्रपट देणाऱ्या आमिर खानच्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ५० कोटींचा गल्लाही जमवता आला नाही. यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ‘बॉयकॉट’ ट्रेंड. आमिर खानच्या या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा जबरदस्त फटका बसला.
रविवारी सकाळीच आमिरने नेपाळ गाठलं आणि तिथल्या एका विपश्यना केंद्रात सध्या आमिर खान रहात आहे. नेपाळमध्ये आमिर खान १० दिवसांच्या मेडीटेशन प्रोग्राममध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमिर खान तिथे त्याच्या मित्रपरिवारसह आहे की एकटाच याबाबत अजूनही कळलेले नाही. अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी आमिर निर्माता म्हणून सक्रिय आहे, आगामी ‘चॅम्पियन’ या चित्रपटाची निर्मिती आमिरच करणार आहे. आमिर खानने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेऊन एकांतात वेळ घालवला आहे.
Bollywood Actor Aamir Khan Break Big decision