मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद, वाळुंज येथील पंचगंगा सीडस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बोगस बियाणे, औषधांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे आढळून आले असून संबंधित कंपनीस विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सचिवस्तरावर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. औरंगाबाद येथील पंचगंगा सीडस या कंपनीच्या बियाण्यांची जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी तपासणी केली असता. या तपासणीमध्ये भेंडी व वांगी बियाण्यांच्या ७५ टन बियाण्यांचा अवैध साठा आढळून आला. शेतकऱ्यांना बोगस बियाणे व औषधांची विक्री परवान्यात समाविष्ट नसलेल्या करून फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करणारी अशी लक्षवेधी सूचना सदस्य अनिल पाटील यांनी मांडली या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य नाना पटोले सहभाग घेतला.
कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, औरंगाबाद येथील पंचगंगा सीडस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बियाणे उत्पादक व साठवणूक केंद्राची जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी यांनी दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी तपासणी केली. या तपासणीवेळी भेंडी पिकाच्या वाणाच्या परवान्यामध्ये समाविष्ट नसलेल्या क्रांती-२९३ या वाणाचे ३० हजार पाकीटे, ७.५ मेट्रिक टन आढळून आली.तसेच प्लास्टिक बाटल्यांमध्ये द्रवरूपात भरून ठेवलेले संशयास्पद साहित्य पॅकिंग करीत असल्याचे आढळले. परवान्यामध्ये समाविष्ट नसलेली बियाणे, अनधिकृत बियाणे, कीटकनाशके विक्रीप्रकरणी चौकशी सुरू असून कोणत्याही बियाणे कंपनीला कृषी विभाग पाठीशी घालणार नाही. या कंपनीकडून कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबतची अनियमितता तसेच सर्व चौकशी जलदगतीने करण्यात येइल तसेच संबधित कंपनीचा परवाना देखील रद्द करण्यात येईल, असेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात सांगितले.