मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील बोगस शाळांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात आता मंत्रालयातील कनेक्शनची शक्यता वर्तवली जात असून त्यासाठी चौकशीचे जाळे पसरविले जाणार आहे. या जाळ्यात काही मोठे मासे हाती लागतील, असे तपास यंत्रणेतील सूत्रांकडून कळते.
बोगस शाळा प्रकरणाने राज्यातील एकूणच शिक्षण यंत्रणा हादरून गेली आहे. या प्रकरणात आता दररोज नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. ज्या गणेश इंटरनॅशनल स्कूलने शिक्षण आयुक्तांचा बोगस आदेश तयार केला, त्यांनी आयुक्तांची स्वाक्षरी कॉपी करताना मात्र एक चूक केली आणि त्यातून बरच काही पुढे आलं. या आदेशावर २०१८ हे वर्ष आहे आणि ज्या शिक्षण आयुक्तांची स्वाक्षरी आहे, त्यांचा कार्यकाळ २०१६ पर्यंतच होता. तत्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बोगस स्वाक्षरी वापरली असल्याचे तर स्पष्ट झालेच आहे, पण वर्ष नमूद करताना मात्र शहानिशा करण्यात आली नाही. त्यामुळे शाळेचा बोगस कारभार उघडकीस आला.
शाळा मंजूर करून घेण्यासाठी हा प्रकार राज्यभर विविध संस्थांनी करून घेतल्याचेही त्यानंतर बोलले जात आहे. अर्थात बनावट सह्या आणि बनावट आदेश यामुळे या प्रकरणात मंत्रालय कनेक्शनची शक्यता वर्तवली जात आहे. अश्यात येत्या काही दिवसांत मंत्रालयातील चौकशीमध्ये मोठ्या नेत्यांच्या सहभागाची बाब उघडकीस आली, तर आश्चर्य वाटायला नको.
आयुक्त कार्यालयाची चौकशी
या प्रकरणात आता शिक्षण आयुक्त कार्यालयाची सुद्धा चौकशी होणार आहे. तसे झाले तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभागही स्पष्ट होईल. यात काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बोगस एनओसी
बोगस शाळेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर बोगस एनओसीचेही प्रकरण उघडकीस आले. यामध्ये आणखी तीन शाळांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Bogus School Education Commissioner ate Connection