पाटणा (बिहार) – आरोग्य ही मानवी जीवनात अत्यंत महत्वाची गोष्ट असून आरोग्यासंबंधी काही तक्रार असल्यास नागरिक डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे डॉक्टरांनी योग्य उपचार करावेत यावर शस्त्रक्रिया करावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते. परंतु काही वेळा आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर किंवा कर्मचारी अत्यंत हलगर्जीपणा करीत मानवी जीवाशी खेळ करतात, ही अत्यंत भयानक घटना म्हणावी लागेल. असे प्रकार देशभरातील अनेक राज्यांमध्ये वारंवार उघडकीस आलेले आहेत.
बिहारमधील आरोग्य सेवेची वाईट स्थिती वेळोवेळी समोर येत आहे. अरवल येथून एक भयानक प्रकरण समोर आले आहे. करपी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जी डॉक्टरांनी नसबंदी केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यानंतर प्रशासनाला जाग आली असून चौकशी करण्यात येत आहे. या तपासात त्रुटीही समोर आल्या आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संपूर्ण अहवाल तयार करून सरकारला पाठवला आहे.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबीर लावून २१ महिलांची नसबंदी करण्यात आली. यासाठी सर्जनची नियुक्ती करण्यात आली होती. खासगी नर्सिंग होम चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टरलाही बोलावण्यात आले. त्याने १० महिलांवर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी तेथे उपस्थित रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑपरेशनचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
https://twitter.com/RohiniAcharya2/status/1468909336281772034?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1468909336281772034%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-22229490244061823166.ampproject.net%2F2111242025000%2Fframe.html
माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांची मुलगी रोहिणी यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. यात ऑपरेशन थिएटर पूर्णपणे उघडे असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. कोणतीही योग्य काळजी न घेताच महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यात एक कर्मचारी सांगतो की, अजून २० जणांचे ऑपरेशन व्हायचे आहे. आतापर्यंत आम्ही १० हून अधिक महिलांचे ऑपरेशन केले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, सरकारी दवाखान्यात भोंदू डॉक्टरांनी केलेले उपचार दुर्दैवी आहेत. तपासासाठी तयार करण्यात आलेल्या टीमचा अहवाल आला आहे. आरोप वास्तव असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा अहवाल शासनाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.