नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कंपन्या चालवणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेमध्ये, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकार्यांनी दिल्ली स्थित एक मोठी गुन्हेगारी टोळी उघडकीस आणली आहे. ही टोळी 569 बनावट कंपन्या चालवत होती आणि त्यांच्यामार्फत त्यांनी प्रचंड फसवणूक करत 1,047 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केला होता.
मुख्य सूत्रधार ऋषभ जैन, वय 30, दिल्लीचा रहिवासी असून त्याने या बनावट कंपन्या चालवण्यासाठी 10 कर्मचारी नियुक्त केले होते. व्यापक पाळत आणि माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या जयपूर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत या प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यात आणि त्याला पकडण्यात यश आले. या 569 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या टोळीने 6,022 कोटी रुपयांची करपात्र उलाढाल असलेल्या पावत्या जारी केल्या ज्यात 2,000 हून अधिक लाभार्थी कंपन्यांना 1,047 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट समाविष्ट आहे.
यापैकी बहुतांश बनावट कंपन्या दिल्लीत असून राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, आसाम आणि उत्तराखंड या 13 इतर राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या आहेत. आतापर्यंत या टोळीद्वारे आणि दलालांद्वारे वापरण्यात आलेल्या 73 बँक खात्यांवर टाच आणण्यात आली आहे. ऋषभ जैनला आर्थिक गुन्हे न्यायालय, जयपूर येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने ७ जुलैपर्यंत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.









