विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
तुमच्यापैकी किती लोकांनी रिमझिम इस्पात या कंपनीचे नाव ऐकले आहे. कोणीच ऐकले नसेल अशीच शक्यता आहे. परंतु आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशमधील मागास भाग असलेल्या बुंदेलखंड येथील रिमझिम इस्पात आणि तिच्या कामाबाबत माहिती देणार आहोत. स्टेनलेस स्टिलच्या उत्पादनात जगातील अग्रगण्य कंपन्यांपैकी ती एक आहे. देशभरात ऑक्सिजनविना हाहाकार उडालेला असताना कोट्यवधीचा स्टिल उद्योग बंद करून कंपनीने गरजू रुग्णालयांना मोफत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातीलच नव्हे तर, आजूबाजूच्या राज्यांनासुद्धा रिमझिम इस्पातच्या ऑक्सिजन प्लांटमधून दररोज जवळपास अडीच हजारांहून अधिक गॅस सिलिंडर रुग्णालयांना मोफत पुरवले जात आहेत. मानवतेची सेवा करणे याहून अधिक काहीच असू शकत नाही, असे कंपनीचे मालक आणि कानपूर येथील रहिवासी योगेश अग्रवाल यांचे म्हणणे आहे. भलेही दररोज कोट्यवधी रुपयांचे स्टिलचे उत्पादन होत नसले तरी, माणसाचे प्राण वाचविण्याची किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षाही अधिक आहे, असे त्यांनी सांगितले.
योगेश अग्रवाल म्हणाले, बुंदेलखंड भागातील हमिरपूर जिल्ह्यात भरुआ सुमेरपूर गाव आहे. याच गावात त्यांचा रिमझिम इस्पात नावाचा स्टेनलेस स्टिलचा सर्वात मोठा कारखाना आहे. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याच्या बातम्या पाहिल्या, वाचल्या. तेव्हा आपल्या कारखान्यातील ऑक्सिजन गरजवंतांना का देऊ नये हा विचार त्यांच्या डोक्यात आला. हा विचार कृतीत बदलण्यासाठी काही सेकंदांचाच वेळ लागला.
योगेश अग्रवाल यांच्या माहितीनुसार, त्यांनी मुलगा रोहित आणि मुलगी गरिमा यांच्या चर्चा केली आणि गरजू रुग्णालयांना कारखान्यातून मोफत ऑक्सिजन पुरवण्याचे निश्चित करण्यात आले. १७ एप्रिलपासून उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात आणि एनसीआर क्षेत्रात रिमझिम इस्पातमधून मोफत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. त्यांच्या या कामात कानपूरचे भाजपचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची क्रीडा संस्था क्रीडा भारतीचे क्षेत्रिय संयोजक संजीव पाठक बॉबी यांनी मदत केली. प्रशासकीय मंजुरीसाठी कानपूर विभागीय आयुक्त राजशेखर यांच्याकडे अग्रवाल यांना घेऊन गेले. प्रशासकीय मान्यतेचे सोपस्कार पूर्ण करून त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला.
सुरुवातीला त्यांच्या कारखान्यातून १ हजार सिलिंडरचा पुरवठा केला जात होता. हळूहळू वाढवून एका आठवड्यात अडीच हजार सिलिंडरचा पुरवठा केला जाऊ लागला. त्यांच्याकडे चार ऑक्सिजन प्लांट आहेत. ४ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या त्यांच्या कंपनीने उत्पादनाच्या जवळपास ५० टक्के काम पूर्णपणे बंद केलेले आहे.