ढाका (बांगलादेश) – सुगंधा नदीत एका प्रवासी बोटीला लागलेल्या आगीत ३६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. अपघाताच्या वेळी बोटीमध्ये सुमारे १ हजार प्रवासी होते.
राजधानीपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या झलकोटी जिल्ह्यात हा अपघात झाला. या घटनेच्या वेळी काही जणांनी नदीत उडी मारून जीव गमावला. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत ३६ मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जळालेल्या लोकांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बोट राजधानी ढाका येथून बरगुना येथे जात होती. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोटार बोटीला अचानक आग लागली. आग लागली तेव्हा प्रवासी झोपले होते.
दरम्यान, आग लागल्याचे समजताच बोटीत एकच खळबळ उडाली. झोपेत असल्याने काही प्रवाशांना काय झाले हे समजू शकले नाही, तर भीषण आग पाहून काही प्रवाशांनी नदीत उड्या घेतल्या. यामध्येही अनेकांचा जीव गेल्याची भीती आहे. आगीची माहिती मिळताच बारीशाल विभागाचे अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाचे उपसंचालक कमाल उद्दीन भुईया यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या १५ गाड्या पहाटे ३.५० वाजता घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.