नाशिक – मे महिन्याच्या अखेरीस, खास स्कुबा डायविंग साठी प्रसिद्ध असलेली “आरमार” ही बोट, नाशिकच्या बोटक्लब मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. वारा, वादळ किंवा पावसात देखील न थांबता ही बोट नाशिककरांना बोटींगचा आनंद देऊ शकेल इतकी सुसज्ज असल्याची माहिती बोट क्लबतर्फे देण्यात आली.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या भीतीने त्रासलेले नाशिककर आता घराबाहेर पडू लागल्यानंतर गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोट क्लबकडे चांगलेच आकर्षित होऊ लागले आहेत. माञ हळूहळू धरणातील कमी होत चाललेली पाण्याची पातळी हा सध्या चिंतेचा विषय ठरु पहातो आहे. खरेतर बोट क्लब सुरु झाल्यानंतर मागच्या वर्षी एप्रिल-मे दरम्यान लॅाकडाऊनची बंधने असल्याने ही अडचण जाणवली नव्हती. परंतु, सद्यस्थितीत वेगवेगळ्या बोट राईडस आणि फेरीचा आनंद घेण्यासाठी जिथून पर्यटकांना बोटीत बसवले जाते, तो प्लॅटफॅार्म पाणी पातळी कमी झाल्याने ३०० ते ४०० मीटर आत गेला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून पर्यटकांना तिकीट घेतल्यानंतर, इलेक्ट्रिक वाहनाने त्या प्लॅटफॅार्म पर्यंत सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सगळ्या अडचणींवर मात करुन शक्य होईल तोपर्यंत नाशिककरांना बोटींगचा आनंद लुटता यावा यासाठी एमटीडीसीच्या या बोट क्लबचे व्यवस्थापक धीरज चोपडेकर आणि महाव्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी हे नियोजन करीत आहेत. खासकरून, संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी खुलून दिसणाऱ्या इथल्या निसर्गसौंदर्यात वेगवेगळ्या थरारक बोट राइडस घेऊन नाशिककर सध्या या बोट क्लबचा आनंद लुटताना दिसत आहेत. लेक सफारी, लेक लक्झरिअस क्रुजींग, रीगल स्पीड बोट राईड, कयाकिंग, जेट्स स्काय, बंपर राइड बनाना राईड, व्हर्लपूल राईड, फ्लाईंग फिश असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स आणि अँडवेंचरचे प्रकार इथे अनुभवता येतात. अर्थात, या राईडसचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. इथल्या अनेक आधुनिक बोटींच्या ताफ्यात ‘आरमार’ या आणखी एका अतिशय सुंदर अशा बोटीची भर पडल्यास नाशिककरांना नाशिकमध्येच राहून कोकणाचा आनंद लुटता येणार आहे.