मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे अतिशय भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली बीएमडब्ल्यू कार आणि एसी बस यांचा हा अपघात आहे. या अपघातात आलिशान अशा बीएमडब्ल्यू कार अक्षरशः चक्काचूर झाली आहे. तर, कारच्या चारही एअरबॅग वेळीच उघडल्याने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा आहे. जगताप हे पुण्याहून मुंबईकडे येत होते. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांची कार रसायनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आली. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील ही कार थेट एसटी महामंडळाच्या बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, आलिशान अशा बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. तसेच, वेळीच कारमधील चारही एअरबॅग उघडल्याने कारमधील जगताप आणि चालक यांचा जीव वाचला आहे. या अपघातात चालक किंवा जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातामुळे हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी ती काही वेळाने सुरळीत केली.