मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या काळात एकीकडे लोकांवर उपाशी राहायची वेळ आली, गरिबांचे व्यवसाय बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अश्या काळात अधिकाऱ्याने शंभर कोटींची कमाई केल्याचा संशय व्यक्त होत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांची शंभर कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यातूनच ईडीने छापेमारी सुरू केली आहे. आतापर्यंत १५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात महानगरपालिकेने जी काही कंत्राटे दिली, ती काही मध्यस्थांच्या माध्यमातून दिली. यात युवासेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्यालह चार ते पाच मध्यस्थांचा यात समावेश आहे. ईडीने जवळपास १५ ठिकाणी छापे मारून १५० कोटींहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि गुंतवणुक, ७० लाख रुपये रोख व अडिच कोटी रुपयांचे दागीणे जप्त केले आहेत.
संपूर्ण प्रकरणात सूरज चव्हाण कंत्राट मिळवून देण्यासाठी मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘ईडी’ने सूरजसह इतर चौघांना समन्स बजावले असून, त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ‘ईडी’कडे चौकशीला उपस्थित राहण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानुसार तेही सोमवारी ‘ईडी’समोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संजीव जयस्वाल यांचे पाय खोलात
सनदी अधिकारी जयस्वाल यांच्या वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थानावर छापा टाकून ‘ईडी’ने १३ लाखांची रोकड जप्त केली. त्याबरोबरच मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. ‘ईडी’ने जयस्वाल यांची मढ आयलंडमधील अर्धा एकर जमीन आणि त्यांच्या इतर अनेक मालमत्तांचीही ओळख पटवली आहे. या सर्व मालमत्तांची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
आदित्यचे निकटवर्तीय सुरज चव्हाण
युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ‘ईडी’ला उपनगरात खरेदी करण्यात आलेल्या चार ते पाच सदनिकांची माहिती मिळाली आहे. त्यांची किंमत १० ते १२ कोटी रुपये असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.