विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लसीकरण केल्यानंतर कोणताही व्यक्ती १४ दिवसांनतर रक्तदान करू शकतो. तसेच कोरोनाबाधितांचा आरटीपीआर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनंतर संबंधित व्यक्ती रक्तदान करू शकणार आहे. स्तनदा मातांसाठी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे. परंतु त्यांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. याबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाशी चर्चा सुरू आहे.
सरकारने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड (नेगवॅक) च्या शिफारशींनंतर या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. लसीबाबत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाच्या अहवालावर आणि जागतिक वैज्ञानिकांच्या माहितीच्या आधारावर तज्ज्ञांच्या गटाने या शिफारशी केलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींवर लसीचा परिणाम तीन महिन्यांनंतर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लसीकरणाशी संबंधित अधिकार्यांना या शिफारशींकडे लक्ष देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कोणताही व्यक्ती कोरोनाबाधित झाला तर संबंधित व्यक्ती बरा झाल्यानंतर त्याच्या तीन महिन्यांनंतर दुसरा डोस दिला जावा, अशी शिफारस तज्ज्ञांच्या गटाने केली आहे. त्याचप्रमाणे गंभीर आजारांचे रुग्ण किंवा आयसीयूमधील रुग्णांना सुटी झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यापर्यंत लसीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे
नव्या मार्गदर्शक सूचना
– स्तनदा मातांसाठी लस सुरक्षित
– तज्ज्ञ गटांच्या शिफारशींना सरकारकडून मंजुरी
– लसीकरणाच्या १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकणार
– कोरोनाबाधितांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याच्या १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकणार
– कोरोनाबाधितांचे लसीकरण रुग्णालयातून सुटी झाल्याच्या तीन महिन्यांनंतर करता येणार
– लसीकरणापूर्वी कोणालाही रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याची गरज नाही