मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवी शरीरात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त होय, त्यामुळेच या रक्ताचा नेहमीच उल्लेख होत असतो. रक्ताची नाती, रक्ताची शपथ, तो गुण माझ्या रक्तात भिनला आहे, वगैरे परंतु एखादा व्यक्ती अपघातात अत्यावस्थ झाला किंवा एखाद्याला गंभीर आजार झाल्यास रुग्णालयात दाखल करावे लागल्यास रक्त देण्याची गरज भासते. त्यासाठी रक्तदाते असतात, रक्तपेढ्या देखील असतात. परंतु यापुढे रक्त देखील महाग होणार आहे.
वाढत्या महागाईमुळे गॅस सिलिंडरपासून ते किरणापर्यंत महाग झाले असताना आता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे पत्रक नुकतेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले होते. त्यानंतर राज्य परिषदेने दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
विशेष म्हणजे सन २०१४ नंतर प्रथमच दरवाढ होत आहे. रक्त आणि रक्त घटक (रेड ब्लड सेल) यांच्याच किमतीत १०० रुपयाने वाढ होणार आहे. मात्र प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नाही. खासगी रक्तपेढ्यांमधील एका बाटलीची किंमत सध्या १,४५० रुपये असून १,५५० रुपये होणार आहे.
सध्या राज्यात एकूण ३६३ रक्तपेढ्या असून ७६ रक्तपेढ्या सरकारी व महापालिकेच्या आहेत, तर २८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या आहेत. राज्यात सन २०२१ मध्ये सुमारे १६.७३ लाख पिशव्या तर २०२२मध्ये (जुनमध्ये ६ महिन्यात ) ८.३४ लाख पिशव्या संकलन झाले.
लोकसंख्येच्या तुलनेत १ टक्के रक्त संकलित केले पाहिजे. राज्याने गेली काही वर्षे त्याच्यापेक्षा अधिक रक्त संकलित केले आहे. किमान आधारभूत किंमत असलेली रक्ताची पिशवी महागणार आहे. रक्त अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या अतिरिक्त चाचण्यांवरील शुल्कनिश्चितीही केली जाणार आहे. रक्ताची किंमत वाढवण्याची शिफारस राज्याकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. केंद्राच्या प्रतिसादानुसार अंमलबजावणी केली जाईल.
Blood Bag Bottle rate will Increased Soon Proposal State Government