विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना महामारीसोबत आता काळ्या बुरशीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. देशातील २६ राज्यांमध्ये काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. काळ्या बुरशीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचे ३०,१०० व्हायल (कुप्या) वाटप केल्या आहेत. मात्र या कुप्या मागणीच्या दहा टक्के सुद्धा नसल्याचे स्पष्ट होत आहे.
देशात सध्या काळ्या बुरशीच्या २० हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी दररोज ३० हजार व्हॉयल आवश्यक आहेत. एका दिवसात दोन वेळा हे इंजेक्शन दिले जाते. बहुतांश रुग्णांना जवळपास सहा आठवडे हे इंजेक्शन द्यावे लागते, असे केंद्रीय रसायन आणि खते मत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले आहे.
अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम आणि नागालँडला वगळून इतर सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये काळा बुरशीचे रुग्ण दाखल आहेत. देशात सध्या एक लाख इंजेक्शन उत्पादनाची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.
सात राज्यात सर्वाधिक रुग्ण
आरोग्य मंत्रालयाचे एक अधिकारी सांगतात, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बुरशीजन्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या राज्यात सर्वाधिक इंजेक्शन्स पुरविण्यात आले आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सरकारने या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना १२६० व्हॉयल पुरविण्यात आले आहेत.
डॉक्टरांच्या भावनांचा फुटतोय बांध
काळ्या बुरशीमुळे तडफडणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधे आणि इंजेक्शन मिळू शकत नसल्याने डॉक्टरांच्या भावनांचा बांध फुटतोय. बुरशीच्या आजाराने त्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु तरीही त्यांचा जीव वाचवू शकत नसल्याची हतबलता बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयाचे डॉ. रघुराज हेगडे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया करून डोळे काढून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही रुग्णांच्या शरीरात बुरशी आधीच पसरली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. काही रुग्ण पहिल्या स्टेजवर असूनही केवळ त्यांना वेळेवर औषधे मिळत नसल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे काळ्या बुरशीचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.