विशेष प्रतिनिधी, मुंबई
काळ्या बुरशीमुळे होत असलेल्या म्युक्रोमायकोसिस या आजाराचे राज्यात १५०० रुग्ण आहेत. त्यातील ५०० रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर जवळपास ८५० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या रोगाने ९० जणांचा राज्यात मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. या आजारासाठी लागणारे अॅम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन केंद्र सरकारने पुरवावे. हवे तर त्याचे पैसे राज्य सरकार देईल, असेही डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.
अॅम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शनबाबत राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले आहे. मात्र, अद्याप उपलब्धता झालेली नाही. १ जून नंतरच हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असे दिसते आहे. महाराष्ट्रात या इंजेक्शनची निर्मिती करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारा खर्च सरकार देणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.