विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना काळात आता ब्लॅक फंगस म्हणजे काळ्या बुरशीचा आजार देशात मोठया प्रमाणात फैलावत आहे. देशात आतापर्यत 8848 रुग्ण आढळले असून सुमारे 200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे विशेषत: महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात हा प्रकार झपाट्याने पसरत आहे.
काळ्या बुरशीचे गुजरातमध्ये सर्वाधिक 2281 रुग्ण आढळले आहेत आणि 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, चंदीगड राजस्थान आणि तेलंगणा यांनी काळ्या बुरशीला साथीचा रोग असल्याचे जाहीर केले आहे. अन्य राज्यांच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये काळ्या बुरशीचे 103 आणि दोन मृत्यूची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये 101 रूग्णांमध्ये म्यूकोरामायसिस झाला आहे आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणात 😯 रुग्ण आढळले आहेत, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात काळ्या बुरशीचे 97 रुग्ण आहेत मात्र येथे मृत्यू झाले नाही.
मध्य प्रदेशात काळ्या बुरशीचे एकूण 575 रुग्ण आढळले आहेत आणि सरकारी आकडेवारीनुसार 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 95 लोकांमध्ये काळ्या बुरशीचे प्रमाण सापडले असून आठ जणांच्या मृत्यू झाल्याची खात्री पटली आहे. दिल्लीत 203 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये 268 रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे 2O00 हून अधिक रुग्ण आढळले असून त्यापैकी सुमारे 150O रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच एक रुग्ण सरासरी 60 ते 100 इंजेक्शन्स घेऊ शकतो. या प्रकरणात, सरासरी दीड लाख इंजेक्शन्सची आवश्यकता असून वेळेवर गंभीर रूग्णांची अपुऱ्या इंजेक्शनमुळे हा आजार अधिक गंभीर होऊन जीवघेणा होऊ शकतो.
दरम्यान, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. डी.एस. राणा म्हणाले की, कोरोना रूग्णांवर उपचार करत असताना औषधासाठी अर्ज करावा लागतो. अशा परिस्थितीत औषध मिळण्यास वेळ लागत आहे, ज्यामुळे रुग्णांची स्थिती वेगाने खालावत आहे. ऑक्सिजन आणि रीमॅडेसिव्हिर इंजेक्शन्सची टंचाई त्यात आता काळ्या बुरशीच्या औषधांचे संकट उद्भवण्याची भीती डॉक्टरांना आहे. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे कठीण होईल. सरकारच्या परवानगीने शासकीय पुरवठा चांगला होतो, परंतु रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने यंत्रणा अस्वस्थ होऊ शकते.