पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप पुढील दोन वर्षांसाठी (2025-26) अकरा राज्यांच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणींच्या शपथविधी समारंभाने झाला. नाशिकच्या साखला मॉल्स या उद्योग समूहाचे अध्यक्ष नंदकिशोर साखला यांची बीजेएसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, सिनेअभिनेते आमिर खान, राजेंद्र लुंकड, प्रफुल्ल पारख, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साखला दाम्पत्याचा भव्य सत्कार समारंभ तसेच भूतकाळातील राष्ट्रीय कार्यकारिणीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय कार्यकारिणीत गौतम बाफना, संपत्ती सिंघवी, संजय सिंघी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पंकज चोपडा, दिनेश पालरेचा, प्रदीप संचेती, दीपक चोपडा, विलास राठोड, ग्यानचंद अचलिया, श्रीपाल खेमलापुरे, निरंजन जुआ जैन, ओम लुणावत, रमेश पटवारी, विजय जैन, राहुल नाहाटा, आदेश चंगाडिया यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे. याशिवाय इतर मान्यवरांचाही या कार्यकारिणीत समावेश आहे.
परिषदेला उपस्थित सर्व प्रतिनिधींनी संघटनेच्या कार्यात झोकून देण्याची शपथ घेतली. शांतीलाल मुथ्था यांनी सर्वांना शपथ दिली. तसेच भारतीय जैन संघटनेतर्फे आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. हे कार्यक्रम प्रत्येक शाखा, जिल्हा, राज्य कार्यकारिणी आणि देशपातळीवर मोठ्या उत्साहाने राबवले जातील. भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवशेनात दुसर्या सत्रात देवेंद्र फडणवीस बोलत होते की, भारताच्या जीडीपी मध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे. भारताच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या मार्गावर जैन समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. भगवान महावीर आणि सर्व तीर्थकारांनी दिलेल्या तत्त्वांमध्ये “घेण्यापेक्षा देण्याची” भावना आहे. त्यामुळेच जैन समाज हा घेणारा नाही तर देणारा समाज म्हणून ओळखला जातो. या दृष्टीकोनातून भारतीय जैन संघटना (बीजेएस) समर्पण भावनेने काम करत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शरद पवार म्हणाले की, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात गेल्या ४० वर्षांपासून भारतीय जैन संघटनेने मोठे योगदान दिले आहेत. देशात जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होते, तेव्हा ती सोडविण्यासाठी ते सगळ्यात आधी पुढे येतात. भविष्यात जल, जंगल आणि जमिनीच्या संवर्धनासाठी भारतीय जैन संघटनेचे मोठे योगदान राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.