मुंबई – रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात यामागे काही तरी काळंबेरं आहे असे सांगतानाच राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
रेमडीसीवीरचा साठा करणार्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरलीय ? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
देशात आणि राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना या निर्यातीवर केंद्राने बंदी घातली आहे. देशात ७ कंपन्याना देशातंर्गत विक्रीची तर दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची परवानगी दिली आहे. याउलट १७ कंपन्यांना निर्यात करण्याची परवानगी आहे. याच कंपन्या परदेशात विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांना निर्यात करत आहेत. निर्यात बंदी घातल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे राज्यसरकारशी अप्रोच झाले आणि आमच्याकडे रेमडीसीवीरचा साठा आहे तो विकण्याची परवानगी द्या अशी मागणी केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत राजेश डोकानिया यांनी भेट घेतली होती असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
पोलिसांना निर्यात करणार्या कंपन्याकडे औषधाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी बीकेसी येथील पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. त्यांच्याकडे माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत असतानाच रात्री ११.१५ वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार पराग अळवणी पोचले. डोकानियाला सोडवण्यासाठी राज्याचे दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार का गेले असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
ज्यांच्याकडे साठा आहे ते स्वतः खरेदी करून आणि स्वतः विकू अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. शनिवारी सगळी परिस्थिती झाल्यावर एफडीएने रात्री दहा वाजता परवानगी दिली होती. त्याची कॉपी दाखवल्यावर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडून दिले. गरज पडल्यास पुन्हा बोलावू असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस यंत्रणा जनतेसाठी काम करतेय. काळाबाजार रोखण्यासाठी काम करतेय. साठा असेल तो जप्त करून लोकांना दिला पाहिजे या भूमिकेतून काम करतेय असेही नवाब मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीस वकील आहेत. म्हणूनच ते राजेश डोकानियासाठी वकीलपत्र घेऊन त्याची बाजू मांडत होते. राजेश डोकानियाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरलीय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याच्या हितासाठी पोलीस आणि राज्याची एफडीए यंत्रणा काम करतेय. मग दोन तासासाठी चौकशीला पोलिसांनी बोलावल्यावर राज्यातील भाजपचे प्रमुख जातात यामध्ये त्यांचा राजेश डोकानियाबरोबर संबंध काय आहेत याचा खुलासा भाजपने करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक काहीही बोलत राहतात. मी काहीही बोलत नाही साठा या लोकांकडे आहे हे तुम्ही ट्वीट करुन सांगताय. ५० हजाराचा साठा आम्ही वाटणार आहे असेही सांगत आहात मग राज्यसरकार रेमडेसिवीर मागतेय तर भाजपाचे केंद्रातील सरकार का देत नाही यामागे काय राजकारण आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता फोनवर माहिती घेऊ शकतो किंवा चौकशी करणार्या पोलीस अधिकाऱ्याच्या वरिष्ठांसोबत चर्चा करु शकतात. परंतु प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकारे वकीली करणे यामागे राजकारण काय आहे हे स्पष्ट दिसत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.