नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपाने पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले आहे. जगदीप धनखड हे एकेकाळी राजस्थानच्या राजकारणात भाजपाचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी धनकड यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बहुतांश जणांना हा प्रश्न पडला आहे की चर्चेतील अनेक नावे सारुन भाजपने धनखड यांनाच का उमेदवारी दिली त्यामागे भाजपचे समीकरण किंवा राजकारण काय आहे हे आता आपण जाणून घेऊया….
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
मूळचे राजस्थान येथील असलेले जगदीप धनकड हे जाट समाजाचे नेते म्हणून परिचित आहेत. अनेक वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि नेते म्हणून देखील परिचित आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. आपल्या राजकीय वाटचालीत धनकड यांनी खासदार, आमदार राज्यपाल पद अशी महत्त्वाची पदे भूषविले आहेत.
राजस्थानच्या झुंझनु लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच केंद्र सरकारमध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. एकेकाळी धनकड हे राजस्थानच्या राजकारणाचा प्रसिद्ध चेहरा होते. जगदीप धनकड हे जाट समाजातील नेतृत्व आहे. जाट समाजाला आरक्षण मिळवून देण्यात देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
मुख्य म्हणजे सध्या धनकड पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत असून 20 जुलै 2019 पासून त्यांची या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. राज्यपाल पदाच्या काळात धनकड आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये नेहमीच तणावाचे संबंध राहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळेच प. बंगाल मधील कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्याचे म्हटले जात आहे.
चर्चेत असलेल्या नावापेक्षा वेगळेच नाव पुढे आल्याने भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्द अंतिम असतो आणि ते ऐनवेळी गुगली टाकतात, अशीही चर्चा होत आहे. या पदासाठी आता जगदीप धनकड एनडीएचे उमेदवार असणार आहेत. भाजपाचे खूप चर्चेत असलेले मुख्तार अब्बास नक्वी आणि सुरेश प्रभू यांच्या नावाची घोषणा मात्र झाली नाही. धनकड यांच्या निवडीमागे अन्यही काही कारणे आहेत.
देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडीने सध्या देशातले राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपराष्ट्रपती पदासाठी भाजपाने जगदीश धनकड यांची घोषणा केली आहे. या निर्णयाची माहिती देताना नड्डा म्हणाले की, भाजपाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार्लमेंटरी बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र त्या सर्वांमधून अखेर धनकड यांचे नाव निश्चित करण्यात आले. आम्हाला हे सांगताना आनंद होतो की, आम्ही एका शेतकरी मुलाला उपराष्ट्रपती पदासाठी संधी दिली.
या निवडणूकीत धनकड हे विजयी झाले तर ती ओबीसी समजासाठी मोठी संधी असेल. या निमित्ताने ओबीसी समजाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. सध्या अनेक राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. धनकड यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड करून आम्ही ओबीसींच्या बाजून आहोत, असे भाजपाने दाखवून दिले आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. एकेकाळी धनकड हे राजस्थानच्या राजकारणात होते. धनकड हे जाट समाजातील नेतृत्व आहे. त्याचा निश्चितच भाजपाला फायदा होणार आहे.
BJP Vice President Jagdeep Dhankhar Selection Strategy Politics