नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांता फॅाक्सकॅान बहुचर्चित मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याची हाकाटी महाविकास आघाडीचे काही नेते करीत आहेत. परंतू खरी गोम आहे ती जेल मधुन कारभार करणाऱ्या मंत्र्यांच्या सरकारला घाबरूनच वेदांता – फाफॅाक्सकॅानने महाराष्ट्राचा नाद सोडल्याचा आरोप भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केला. ते म्हणाले की, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीच त्यांच्या कार्यकाळात जागेचा प्रश्न असल्या असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याचे सुतोवाच केले होते. तरी पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रयत्नशील राहुन कंपनी अधिकारी यांच्याशी संवाद साधला व महाराष्ट्रात येण्याची विनंती केली, परंतु तो पर्यंत गुजरात सरकारने संपूर्ण पॅकेज सवलती देऊन प्रकल्प मंजूर केला.
प्रकल्प का गेला याबाबत बोलतांना प्रदीप पेशकार यांनी सविस्तर माहिती देतांना सांगितले की, विशेष म्हणजे फक्त जागा हाच मुद्दा नसून सेमीकंडक्टर चिप उत्पादनासाठी मुबलक व विशिष्ट गुणधर्म असलेल्या पाण्याचीही आवश्यकता असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली दिरंगाई आणि तीन्ही पक्षांच्या स्वयंघोषित नेत्याकडून होणारा विशेष “पाठपुरावा” आणि औद्योगिक महामंडळाची तत्कालीन “भुषणावह” कार्यपध्दती बघता वेदांताच्या अधिकारी मंडळींनी सर्व मोर्चा गुजरात कडे वळवला. नाकाने कांदे सोलून भाजपा शिवसेना सरकारवर प्रकल्प घालवण्याची टीका करणा-यांनी अडीच वर्षांत किती नवीन उद्योग प्रत्यक्षात आणले ते सांगावेत. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विभागाने महाराष्ट्रात किती कारखान्यांना क्लोजर नोटिस दिल्या व नंतर काय काय त्रास त्या कारखाना मालकांना झाला तेही जाहीर करावे. एकदा वाटप केलेल्या औद्योगिक महामंडळाच्या भूखंडांना किती ठिकाणी उद्योजकाने कर्ज काढून पैसे भरल्यानंतरही वाटपाला स्थगिती दिली हेही सांगावे. असो बात निकली तो दुर तक जाएगी, असे म्हणून आपण मात्र अशा प्रसंगात फक्त राजकारण न करता कंपनीची बाजूही समजून घ्यायला हवी असेही ते म्हणाले.
अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करताना कोणताही उद्योग राजकीय स्थिरता, नेतृत्वावर विश्वास आणि गुंतवणूकीतून होणारा फायदा, उद्योग पुरक वातावरण, आदी गोष्टी विचारात घेऊनच निर्णय घेत असतो. आता पुन्हा एकदा विश्वास पुर्ण राजकीय नेतृत्वाच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे असून आता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून निश्चितच मोठ्या प्रकल्पांना महाराष्ट्रात आणण्याची बातमी मिळेल याची खात्री आहे.