मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या भाजपच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या क्रमांकाच्या पदाची सूत्रे हाती घेणे ही आणखी धक्कादायक चाल होती. भूतकाळात मुख्यमंत्री झाल्यानंतर कनिष्ठ पद भूषवणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील चौथे राजकारणी ठरले आहेत. मात्र, या निर्णयाद्वारे भाजपने मुंबई महापालिका, लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केल्याचीही चर्चा आहे.
शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, भाजपकडून पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातून शिंदे येतात. इकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये बंडखोरी करणारे शिंदे गट हे सातत्याने ठासून सांगत आहेत की तेच बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत.
भाजपच्या मतदारांना राजकारणात ‘माधव’ म्हणतात. त्यात माळी, धनगर आणि वंजारा समाजाचा संदर्भ आहे. त्याचवेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे राज्यातील इतर मागासवर्गीय आणि शहरी मतदारांमध्येही भाजपचा आलेख वाढला आहे. आता मराठा समाजातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून पक्षाची नजर थेट ३२ टक्के मराठा मतांवर आहे.
सत्ताबदलानंतरही शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून भाजपने हिंदुत्वासाठी आमचा पक्ष त्याग करत असल्याचा संदेश दिला आहे. २०१९ मध्ये झालेल्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने एक पाऊल मागे घेतले आणि शिवसेनेला चाल दिली. मात्र, आता ठाकरे गटाची थेट मुंबई मनपामधूनच हकालपट्टी करणे हे भाजपचे पुढील लक्ष्य असणे स्वाभाविक आहे.
असेही सांगण्यात येत आहे की, शिवसेनेचे अनेक खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबई विभागाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती, मात्र दोनच जण त्यात हजर झाले होते. पाच जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, सरकारला आम्ही बाहेरुन पाठिंबा देत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि संघटन सचिव बीएल संतोष यांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास राजी केले आहे. ही एक धूर्त खेळी समजली जात आहे.
BJP Strategy Maharashtra Politics Big Shocking Changes