नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युद्धाप्रमाणेच राजकारणात देखील सर्व काही माफ असते, असे म्हटले जाते, त्यामुळेच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रूही. भारतीय राजकारणात देखील असेच चित्र आहे. संपूर्ण देश भाजपमय होण्यासाठी पक्षातील वरिष्ठ पातळीवरील केंद्रीय नेतृत्वापासून ते गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी जणू काही चंग बांधलेला दिसून येतो. त्यासाठी आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. विशेषतः दोन वर्षानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार नियोजन सुरू केले आहे. भाजपकडून प्रादेशिक पक्ष संपविले जात असल्याचा आरोप वारंवार होतो. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आता प्रादेशिक पक्षांबाबत ठोस रणनिती आखली आहे.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ज्या चंद्राबाबू नायडूंवर आरोप करत होते की, ते घराणेशाहीचे राजकारण करतात आणि भ्रष्ट आहेत. पण, आता त्यांनाच तेलुगू देसमच्या चंद्राबाबू यांच्यासोबत युती हवी आहे. आगामी संभाव्य धोका लक्षात घेता महत्त्वाच्या आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणा या राज्यात पक्षाने आपल्या रणनीतीत बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायडूंसोबत एक बैठक झाली आहे. त्यानंतर नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या रूपरेषेवर चर्चा केली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तेलुगू देसमने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आंध्रमध्ये सत्ताधारी वायएसआरसीपीसोबत युती करण्यासाठी भाजप उत्सुक होता. मात्र, राजकीय अपरिहार्यतेमुळे ते शक्य झाले नाही. तामिळनाडूत ईपीएस आणि ओपीएस गटांना एकत्र आणण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केरळात बोलताना स्पष्ट केले होते की, सर्व भ्रष्ट विरोधी पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरुद्ध एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे केवळ राज्यातच नव्हे तर, बाहेरही भाजपविरुद्ध एक संभाव्य चेहरा आहेत. नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली आहे.
हरयाणात देवीलाल यांच्या कुटुंबातील तीन गटांना एकत्र आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. हरयाणातील दोन गट दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वातील जेजेपी आणि रणजित कुमार हे आधीच एनडीएचा भाग आहेत. मात्र, भाजपची अशी इच्छा आहे की, अभय चौटाला यांच्या नेतृत्वातील आयएनएलडीने सोबत यावे. जेणेकरून, भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसशी लढता येईल. तसेच लोजपातील दोन गटांत तडजोड करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासून जबरदस्त नियोजनाला सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्र्यांकडे देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी ९ केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत.
महत्वाचे म्हणजे या प्रवासात हे नेते कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर विशेष भर दिला जाणार आहे. याच लोकसभा मिशनची माहिती देण्यात आली आहे. सध्या देशात 113 लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात 16 लोकसभा मतदारसंघ भाजपकडून जिंकण्याचे आव्हान म्हणून निवडण्यात आले. जिथे भाजप यापूर्वी निवडणूक लढवली नाही आणि जिंकलेली देखील नाही. या मतदारसंघांमध्ये भाजपा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवणार आहे. तसेच यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बूथ कमिटी नेमून भाजप सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
आम्ही ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी नुकतीच दिली होती. केंद्रातील काही मंत्री या मिशन अंतर्गत राज्यात दौरे करणार असून, त्यात भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, आदींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले होते.
BJP Strategy for Upcoming Loksabha Election Regional Political Parties
Politics Tamil Nadu Andhra Pradesh Haryana Bihar