विजयवाडा (आंध्रप्रदेश) – राजकीय नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत असतात. प्रामाणिक नेते दिलेली आश्वासने शक्य तितकी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर काही नेते फक्त बोलबच्चन असतात. फक्त बोलतात, करत काहीच नाही. काही नेते तर विचित्र आश्वासने देऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. असेच एक आश्वासन आंध्र प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे.
आंध्र प्रदेशमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी विचित्र वक्तव्य केले आहे. भाजप सत्तेत आला, तर राज्यात ५० रुपयांमध्ये गुणवत्ता असलेली दारूची क्वाटर बाटली उपलब्ध करून देण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते मंगळवारी भाजपच्या सभेला संबोधित करत होते.
आंध्र प्रदेशमध्ये सध्या गुणवत्तापूर्ण दारूची क्वाटर बाटली २०० रुपयांमध्ये मिळते. राज्य सरकारवर हल्लाबोल करताना वीरराजू यांनी आरोप केला, की राज्यात बनावट दारू उच्च किमतीत विक्री केली जात आहे. तर चांगल्या ब्रँडची दारू राज्यात उपलब्धच नाही.
वीरराजू म्हणाले, राज्यात प्रत्येक व्यक्ती दारूवर प्रतिमहिना १२ हजार रुपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी नागरिक दारू पितात. या एक कोटी नागरिकांनी भाजपला मत द्यावे असे मला वाटते. भाजपची सत्ता आल्यावर त्यांना ७५ रुपयांमध्ये गुणवत्ता असलेली दारूची बाटली उपलब्ध करून देण्यात येईल. महसूल चांगला मिळाला, तर ५० रुपये प्रतिबाटली विक्री केली जाईल. सरकारमधील नेत्यांच्या दारूच्या कंपन्या आहेत. या कंपन्या दर्जा नसलेल्या दारूची विक्री करत आहेत.