बुलडाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या विविध भागाचा दौरा सुरू केला आहे. त्याचअंतर्गत ते आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. खासकरुन त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे.
शिवसेनेला मोठे खिंडार पाडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नवा गट स्थापन केला आहे. शिंदे गट आणि भाजप यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. यापुढील वाटचाल ही भाजप आणि शिंदे गटाची बरोबर असणार आहे, असे वारंवार दोन्हीकडून सांंगितले जात आहे. अशातच आता नव्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी एका वक्तव्याने जोरदार चर्चा घडवून आणली आहे. बावनकुळे हे बुलडाण्याच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.भाजपने आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचअंतर्गत त्यांनी कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची माहिती देऊन प्रेरित केले.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, बुलडाण्याचा पुढचा खासदार हा कमळ या भाजपच्या चिन्हावर निवडून येणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. कारण, सध्या बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे आहेत. ते गेल्यावेळी शिवसनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र, आता जाधव यांनी बंडखोरी केली असून ते सध्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे खासदार जाधव यांच्यासह त्यांचे समर्थक आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे बुलडाण्याच्या जागेवर भाजप दावा करणार आहे की काय, अशी शंका शिंदे गटाकडून उपस्थित होत आहे.
BJP State President Chandrashekhar Bawankule Comment Effect on Shinde Group
Rebel MLA