मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, महाविकास आघाडीने अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. भाजपने राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकर-साळवी असा सामना सभागृहात पहायला मिळणार आहे.
अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, आज उमेदवारी अर्ज भरण्यास अर्धा तास बाकी असतांना महाविकास आघाडीने साळवी यांचे नाव जाहीर केले. तसेच त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आबे. साळवी यांचा अर्ज भरतांना काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील तर शिवसेनेचे सुनील प्रभू हे नेते उपस्थित होते. उद्या रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री बनविले आहे. तर, भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वीच शिवसेनेचा सामना बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटासोबतच भाजपशी आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला आहे. परिणामी, चुरस आणखीनच वाढली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. २००९ पासून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेने नुकतेच उपनेतेपद दिले आहे. साळवी हे शिंदे गटात सामील न होता, उद्धव ठाकरे यांना साथ दिली. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर भाजपने उमेदवारी दिलेले राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत.
BJP Shivsena match for the post of assembly speaker Politics