मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपा – शिंदे गट एकत्र असले तरी दोन्ही गटांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेश भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिले होते. तरीदेखील आदेश धुडकावून लावल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईतील भाजपचा महामंत्रीच शिंदे गटाने फोडला आहे. हे प्रकरण आता थेट हायकमांडपर्यंत पोहचले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मुंबईत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपचा महामंत्री फोडला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाला उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तम नेतृत्व मिळाले आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांचा शिंदे गटातील प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
यादव यांच्याकडून आरोप
भाजप सोडून बाळासाहेबांच्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता आमदार मनीषा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे, आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसू दिले नाही, भेटही दिली नाही असं रेखा यादव म्हणाल्या. थोडी नाराजी होती. पण, मात्र आता भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती आहे. महापालिकेत जो उमेदवार दिला जाईल, तो जिंकू, असे राम यादव म्हणाले.
स्थानिक पातळीवर चित्र वेगळे
रेखा यादव यांनी प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष नगरसेविकेची निवडणूक लढवली. तर राम यादव हे भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री होते. भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री राम यादव यांचा शिंदे गटाने महापालिकेत तिकीट देण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे. म्हणूनच शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
BJP Shinde Group Politics Strategy Controversy