मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून फडणवीस यांच्यासोबत संसार मांडला असा आरोप उद्धव ठाकरे करीत असताना भाजपच्याच एका राष्ट्रीय नेत्याने ठाकरे यांच्या एका विधानाला पाठिंबा दिला आहे. ठाकरे यांनी हे विधान निवडणूक आयोगाच्या संदर्भात केला असून आपलेही तेच मत असल्याचे भाजपच्या नेत्याने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह काढून ते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. सोबतच त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणीही केली आहे. याच मागणीला भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. ते दुसरे तिसरे कुणी नसून भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी आहेत. त्यांनी उद्धव यांच्या मागणी योग्य असल्याचे ट्वीट केले आहे. निवडणुक आयुक्तांचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, त्यामुळे माझा उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या बरखास्तीच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तर प्रतिज्ञापत्र का मागितले?
निवडणुक आयोगाने वेळोवेळी मागितलेली कागदपत्रे आम्ही दिली. सदस्यसंख्या मागितली, ती सुद्धा दिली. पहिले वेगळे निकष लावले, मग सदस्यसंख्येचे निकष लावले. एवढेच होते तर एवढी प्रतिज्ञापत्रे का मागितली आम्हाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.
आयोग बरखास्त झाला पाहिजे
आम्ही कार्यकारीणीच्या सभेचे रेकॉर्डिंग निवडणुक आयोगाला दिले. त्यानंतर आयोगाने कव्हरिंग लेटर मागितले. आयोगाने अशापद्धतिने राबविलेली निर्णय प्रक्रिया आम्हाला मान्य नाही. आयोगाची निवड ही निवडणूक पद्धतीनेच झाली पाहिजे. त्यासाठी आत्ताच्या आत्ता निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
I support Uddhav Thakre demand to sack the CEC since his tenure earlier in Finance Ministry was dubious
— Subramanian Swamy (@Swamy39) February 21, 2023
BJP Senior Leader Support Uddhav Thackeray Shivsena Election Commission