मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे. आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजक निर्माण करणे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते.
महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही पाटील म्हणाले.