नाशिक – भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पालखी सोहळा, पायी वारी संदर्भात नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्यासपीठावर निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे संजय नाना धोंडगे, आध्यात्मिक आघाडी चे मेघना आंबेकर, माणिकराव देशमुख, भाजप उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख गोविंद बोरसे यांसह वारकरी प्रतिनिधी होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. शरद पवार व सोनिया गांधी यांच्या विचारांच्या सरकारकडून पायी वारी संदर्भात अपेक्षा नव्हतीच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांचे कडून पालखी सोहळा,पायी वारीची थोडी अपेक्षा होती परंतु इटालियन विचारधारेपुढे लोटांगण घालून हिंदुत्वाची परंपरा मातीत घालणारे वारीची परंपरा काय जोपासणार ?. वारकऱ्यांच्या हिताचा निर्णय अपेक्षित होता. परंतु शासनाने या संदर्भात घेतलेला निर्णयाने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य वारकरी प्रचंड असमाधानी आहे. सहिष्णू व संयमी असलेला वारकरी संप्रदाय परंपरा जपत, मर्यादित संख्येत सर्व निर्बंध पाळून पंढरपूर पायी वारी करायची हा सर्वसामान्य वारकऱ्यांचा निश्चय आहे.
मुक्ताईनगरच्या मेहूण येथून संत मुक्ताई पालखीने काल प्रस्थान ठेवलं असून सरकारचा निर्णय धुडकावून
त्यांच्या पालखीचे ११ वारकऱ्यांसह पंढरपूर कडे प्रस्थानही सुरु झाले आहे. त्यांना सरकारचा निर्णय मान्य नाही.
सरकारने तातडीने आपला निर्णय बदलावा,फेरविचार करावा असेही ते म्हणाले. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर दिसतील, व कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार असतील असेही ते म्हणाले. तसेच वारकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ भाजपाशी आहे असे सरकारला त्यांनी आव्हान दिले.
तसेच जर या दोन दिवसात शासनाने वारकऱ्यांच्या पालखी सोहळा /पायी वारी संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर आध्यात्मिक समन्वय आघाडी व वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवतील.