नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही केंद्रीय मंत्र्यांना बोलावून घेत त्यांचा वर्ग घेतला. आपल्या मतदारसंघात अधिकचा वेळ द्या, लोकांचे म्हणणे ऐकून घ्या, आदी सूचना त्यांनी केल्या. भाजपचे मिशन २०२४ सुरू झाले असून ही त्याचीच नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काही राजकीय जाणकारांनी याविषयावर आपले वेगळे मत मांडले आहे. लोकसभा मतदारसंघ, राज्यांमधील अंतर्गत सर्वेक्षणाचे अहवाल समाधानकारक नाहीत. यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना या सूचना केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस आता एक वर्षाचा कालावधी उरला आहे. लवकरच त्याची लगबग सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या सरकारचे मंत्री व भाजपच्या खासदारांना संकेतांतून सूचना करीत आहेत. मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या समस्या ऐकाव्यात, त्यांनी टीका केली, तरीही ती ऐकून घ्यावी. काही मंत्र्यांना पंतप्रधानांनी सल्ला दिला आहे की, सरकारमधील मंत्र्यांकडून लोकांच्या जास्त अपेक्षा असतात. त्या पूर्ण न झाल्यास लोक नाराजही होतात. यामुळे संयम व सबुरी राखण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशवर सर्वाधिक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशबाबत सर्वांत जास्त चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशातून यावेळी ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे या राज्यावर लक्षही अधिक दिले जात आहे.
वेगवेगळे मतप्रवाह
पंतप्रधान मोदी आपले मंत्री व खासदारांना अलीकडे देत असलेला सल्ला व संदेश महत्त्वाचा मानला जात आहे. पण, या सल्ल्यांबाबत मंत्र्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहे. काही जण त्याला पर्सनल टच मानतात, तर काहींना हा प्रकार अपमानास्पद वाटतो. पण, पुढे येऊन विरोधात बोलण्यास कुणीही तयार नाही.
BJP Politics Survey Report PM Modi Minister MP