मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्ष बाकी असले तरी भारतीय जनता पक्ष आतापासूनच कामाला लागला आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी भाजपने उद्या गुरुवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळण्यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला ४८ लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व प्रभारींना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयात ही बैठक बोलावली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता या बैठक सुरु होईल.
या बैठकीला ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रभारींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेतच शिवाय; भाजपचे सर्व विभागीय संघटन मंत्र्यांनाही बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपचे केंद्रीय पदाधिकारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय पदाधिकारी दौरे करणार आहेत. त्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघांवर अधिक लक्ष द्यायचं याविषयी बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाईल. बारामतीसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात अधिकाधिक सभा घेण्यावर या बैठकीत जोर देण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आजही (दि. २) भाजपची एक बैठक पार पडणार आहे. भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री ८ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा केली जाईल.
BJP Politics Loksabha Election 2024 Strategy
Maharashtra Shinde Group