जळगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठा विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे मराठी आहेत. त्यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहे. संपूर्ण देशात गुजारत निवडणुकीची आणि त्यातील सी आर पाटील यांच्या योगदानाची चर्चा होत असताना सी आर पाटील यांच्या कन्येला मात्र पराभव पत्करावा लागल्याने त्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.
भाविनी पाटील यांच्या पॅनलचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी या निवडणुकीत भाविनी मात्र ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या भाजप कार्यकर्ते – शरद पाटील यांच्या लोकशाही ग्राम उन्नती पॅनलने ६ जागा जिंकल्या आहेत. तर भाविनी पाटील यांच्या पॅनलला अवघ्या ३ जागा मिळाल्या. या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी शरद पाटील यांच्या पॅनलच्या चंद्रकला रघुनाथ कोळी या विजयी झाल्या. भाविनी पाटील यांचे सरपंच पदाचे उमेदवार मात्र पराभूत झाले.
भाविनी पाटील गेल्या वेळेस या ग्रामपंचायीच्या थेट सरपंच होत्या. पण, सरपंचाची ही जागा राखीव झाल्यामुळे त्यांनी पॅनल उभे करुन स्वतः ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक लढवली. त्यात त्या स्वतः विजयी झाल्या पण पॅनल पराभूत झाले. शरद पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक आहेत. सी. आर. पाटील हे सूरत मध्ये राहत असले तरी ते मूळचे जळगाव जिल्ह्याचे आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण, आपल्या गृह जिल्ह्यात कन्येच्या पॅनलचा पराभव ग्रामपंचायतमध्ये होणे हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे.
BJP Politics Gujrat CR Patil Daughter Jalgaon Election
Grampanchayat