इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – “भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढू शकेल असा कोणताही राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाही आणि वंशवादाशी आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपते आहे. काही काळानंतर देशातील सगळे राजकीय पक्ष संपतील आणि केवळ भाजपा राहील”, असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने देशभरात खळबळ माजली आहे. भाजपला सर्व राजकीय आणि खासकरुन प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. भाजप अध्यक्षांच्या वक्तव्याने ते सिद्ध झाल्याने विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये भाजपाच्या १६ जिल्हा कार्यालयांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नड्डा बोलत होते. भाजपाच्या विचारधारेवर असेच चालत राहिलो तर देशातील प्रादेशिक पक्षही संपुष्टात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, “२० वर्ष दुसऱ्या पक्षात राहिलेले नेतेही आता भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. लोकं काँग्रेसबाबत हल्ली बोलत असतात. पण पुढचे ४० वर्ष लागले तरी काँग्रेस भाजपासोबत उभी राहू शकत नाही. आत्ता भाजपा ज्या पद्धतीचा पक्ष आहे, तो दोन दिवसांत तयार झालेला नाही. तो एका वेगळ्या संस्कारातून तयार झालेला आहे. आपल्या पक्षाची विचारधारा एवढी मजबूत आहे म्हणूनच इतर पक्षातील नेते आता भाजपामध्ये येत आहेत.”
हे आहे भाजपचे स्वप्न
२०१४ साली जेव्हा भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळी ते पक्षाच्या मिटिंगसाठी भाजपाच्या कार्यालयात आले होते. तेव्हाच प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यालय असावे असे स्वप्न त्यांनी पाहिले होते, असेही नड्डा यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संकल्प दिला होता की, आपला मोठा पक्ष असल्याने प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा ठिकाणी आपले कार्यालय असायला हवे. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष अमित शाहा यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी भाजपाने ७५० जिल्हे निश्चित केले होते. त्यातील २५० कार्यालये आज उभी आहेत. तर ५१२ कार्यालयांचे काम सध्या सुरु आहे, अशी माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली.
आठवणींना उजाळा
जे. पी. नड्डा यांनी यावेळी बोलताना जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. १९७२-७४च्या काळात एका भाड्याच्या घरात भाजपाचे कार्यालय उभे केले होते. जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आत्ताचे कार्यालय दिल्लीत झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. आजही त्याला ऑफिस नाही तर कार्यालय म्हणलं जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालय हे संस्कार देण्याचे केंद्र असल्याचेही नड्डा म्हणाले.
जेडीयूची प्रतिक्रीया
नड्डा यांच्या वक्तव्यावर बिहारमध्ये भाजपासोबत सत्तेत असेलल्या संयुक्त जनता दलाने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय पक्ष जर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, तर स्वाभाविपणे प्रादेशिक पक्षांचा उदय होईल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी दिली आहे.
BJP National President J P Nadda Statement on Regional Political Parties