नवी दिल्ली – भाजपने पक्षसंघटनेत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये तीन राष्ट्रीय पदाधिकारी आणि दोन प्रवक्त्यांचा समावेश आहे. राज्यांमधील राजकीय आणि सामाजिक समीकरणे पाहून करण्यात आलेल्या या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील भाजप नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड केली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर दोन नव्या सचिवांची निवड केली आहे. त्यामध्ये बिहारमधील ऋतुराज सिन्हा आणि झारखंडच्या आशा लाकडा यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील भाजप नेते भारती घोष आणि शहजाद पूनावला यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे हे मराठा नेते असून, एके काळी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले गेले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय सचिव बनविण्यात आले होते. त्यांना पद्दोन्नती देऊन सरचिटणीस बनविण्यात आले. महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या राजकीय घटनाक्रमांना पाहता ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या निवडीच्या माध्यमातून मराठा समजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहेत.
राष्ट्रीय सचिवपदी बिहारचे ऋतुराज सिन्हा आणि झारखंडच्या आशा लाकडा यांची निवड झाली आहे. ऋतुराज सिन्हा भाजपचे माजी खासदार आर. के. सिन्हा यांचे पुत्र आहेत. बिहारमधील विशेषतः पाटण्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे पाहता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आदिवासी समाजातून येणार्या आशा लाकडा झारखंडच्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारती घोष यांना राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून निवडण्यात आले आहे. त्याशिवाय शहजाद पूनावालासुद्धा राष्ट्रीय प्रवक्ते होणार आहेत. ते सध्या पक्षाच्या अधिकृत पॅनलचे सदस्य होते. या निवडीनंतर अध्यक्षांसह एकूण ४० केंद्रीय पदाधिकार्यांमध्ये फक्त तीन पदे रिक्त राहिले आहेत. यापैकी एक सरचिटणीसपद आणि दोन सचिवांच्या पदांचा समावेश आहे. पदाधिकार्यांची संख्या वाढून १० झाली आहे. भाजपच्या घटनेनुसार महिला पदाधिकार्यांची संख्यासुद्धा दहा झाली आहे. भाजपच्या घटनेनुसार पक्षात एक तृतीयांश म्हणजेच १३ महिला पदाधिकारी असणे आवश्यक आहे. महिलांची अजूनही तीन पदे रिक्त आहेत.