इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक मधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, कमलेश बोडके तसेच उपजिल्हाप्रमुख कन्नु ताजणे यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याची माहिती भाजपने दिली. यावेळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित असल्याचे भाजपने सांगितले.
यांचा प्रवेश नाही
भाजपमध्ये सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा होता. पण, दरम्यान ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीका-यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! त्यानंतर या पदाधिका-यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे.