इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ते मुंबईला रवाना झाले होते. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीच माहिती नसल्याचे सकाळी सांगितल्यामुळे संभ्रम वाढला होता. पण, त्यांचा आज दुपारी ४ वाजता पक्षप्रवेश झाला. त्यांच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला होता. पण, दोन दिवसापूर्वी हा विरोध मावळला असल्याचे सांगण्यात आले होते. स्थानिक पातळीवर आरोप – प्रत्यारोप होत असतात. पण, पक्ष वाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले. ते पुढे असेही म्हणाले की, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल जळगावला बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सांगितले की, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही तर ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे. असे त्यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. यावेळी वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही. त्यामुळे ते स्वत.च्या इच्छेने प्रवेश करत असतील तर प्रवेश द्यावा असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आज हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशावर मात्र आमदार सीमा हिरे या नाराज होत्या. त्यांनी या सोहळ्याला अनुपस्थिती दाखवत आपला संतापही व्यक्त केला.
आमदार हिरे यांनी केले होते हे आरोप
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर १७ गुन्हे दाखल आहे. ज्यांचे संबध दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊन नये अशी मागणी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केली होती.