नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंदीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसह महायुतीला भव्य विजय मिळावा याकरिता कार्यकर्ता आणि सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाह म्हणाले की, दलित, शेतकरी आणि महिला विरोधी महाविकास आघाडी महाराष्ट्राचे कल्याण करू शकत नाही, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाला गती फक्त महायुतीचे सरकारच देऊ शकते. महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करण्यास सज्ज आहेत असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये सातपुर येथील डेमोक्रॅासी हॅाटेलमध्ये झालेल्या या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील ७५० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. या दौ-याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शाह यांनी आपल्या संबोधनामधून सर्व कार्यकर्त्यांमध्ये लढण्याचे नवे स्फुल्लिंग चेतवले. या मेळाव्यातून उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड ऊर्जा घेऊन गेले. मला विश्वास आहे, आगामी विधानसभा निवडणुकाच्या प्रचार कार्यात ही ऊर्जा कार्यकर्त्यांना बळ देईल.
यावेळी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॅा. राहुल आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील केदार, नाना शिलेदार, पवन भगुरकर यांनी परिश्रम घेतले.