मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. त्यावेळी मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला होता परंतु दाऊद इब्राहिमच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपाच्या मोर्चाला संबोधित करताना केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी संघर्ष करेल. गावोगावी, रस्तोरस्ती भाजपा निदर्शने करेल. दाऊदला संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू आणि हा संघर्ष यशापर्यंत नेऊ असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जनतेमध्ये संताप उसळल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील महिना शंभर कोटीच्या वसुलीबाबत सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ताबडतोब देशमुख यांनी राजीनामा दिला. नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याचा निर्णय आघाडीच्या प्रमुखांनी घेतला होता. पण नंतर दाऊदचा असा दबाव आला की राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला. दाऊदच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारला हटविण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. त्यांची विजेची कनेक्शन कापली जात आहेत आणि पिके पाण्याअभावी जळत आहेत. पण दाऊदला संरक्षण देण्यासाठी आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार धडपडत आहे. त्यांना शेतकऱ्यांना नाही पण नवाब मलिक यांना वाचवायचे आहे.
LIVE Speaking at @BJP4Mumbai’s massive protest #NawabHataoDeshBachao at Azad Maidan, Mumbai !#Mumbai #Maharashtra #AzadMaidan https://t.co/ZU4diU8EJt
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2022