विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा असताना आता थेट खासदारच लसीकरणात कमिशन घेत असल्याची बाब समोर आली आहे. एका ऑडिओ टेपद्वारे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे. त्यामुळे ही बाब देशभरात चर्चेची ठरत आहे.
लसीचा तुटवडा असल्याने राजकीय गोटात जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कर्नाटकमध्ये देखील असाच प्रकार सुरू आहे. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून लसीकरणासाठी कमिशन घेतल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नेहमीच वादग्रस्त ठरणारे भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या हे सध्या नव्या वादात अडकलेले आहेत. कॉंग्रेसने एका कथित ऑडिओ टेपचा हवाला देऊन आरोप केला आहे की, कर्नाटकातील खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या प्रत्येक डोसवर शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचे निकटवर्तीय नातेवाईक आमदार रवी सुब्रमण्यम यांच्याशी या कमिशनचा थेट संबंध असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, भाजपच्या या दोन्ही संबंधित नेत्यांविरूद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी आणि त्या दोघांचे लोकसभा व विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले जावे. कॉंग्रेसच्या या आरोपावरुन भाजपचे अन्य नेते किंवा सूर्या यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सुब्रमण्यम यांनी मात्र ट्विटद्वारे आणि कर्नाटकातील स्थानिक माध्यमांशी संवाद साधून आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.