कोलकाता (पश्चिम बंगाल) – कोणतीही निवडणूक आली की त्या मतदारसंघांमध्ये अनेक उमेदवार दिसू लागतात. परंतु निवडून आल्यावर मात्र हे विजयी उमेदवार गायब होतात. मग ती लोकसभा निवडणूक असो की आणखी कोणतीही निवडणूक. त्यामुळे जनतेच्या समस्यांचे निराकरण आणि विकासकामे ठप्प होतात. त्यातून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते.
विशेषतः निवडून गेलेले खासदार पाच वर्ष आपल्या मतदार संघात दिसत नाहीत, त्यामुळे मग आमचे खासदार बेपत्ता असे पोस्टर देखील नागरिकांकडून लावण्यात येतात. सध्या पश्चिम बंगाल मध्ये असेच घडत आहे. हुगळीच्या भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी बेपत्ता झाल्याचे पोस्टर त्यांच्या मतदारसंघातील पांडुआ परिसरात आढळून येत आहेत.
बीडीओ कार्यालय, पंचायत कार्यालय, तेलीपाडा जंक्शन आदी सार्वजनिक ठिकाणांसह अनेक भिंतींवर हे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. मात्र, या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नाव लिहिलेले नाही. हस्तलिखीत पोस्टर्सवर बंगाली भाषेत लिहिले आहे की, “आमचे खासदार लॉकेट चॅटर्जी बऱ्याच काळापासून बेपत्ता आहेत. कृपया त्यांचा ठावठिकाणा कळवा.”
यात राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा हात असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, मी नेहमीच आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या बाजूने आहे. मात्र टीएमसीचे नाव न घेता चटर्जी म्हणाल्या की, या घाणेरड्या खेळामागे माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. पण ते माझी किंवा भाजपची अशी बदनामी करू शकणार नाहीत. सध्या मी उत्तराखंडमध्ये आमच्या पक्षाच्या संघटनात्मक कामात सामील आहे. कारण तेथे निवडणुका होणार आहेत. तसेच, मी लोकसभेच्या अधिवेशनात सहभागी होत आहे.
चुंचुरा विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर लॉकेट चॅटर्जी लोकसभा मतदारसंघात दिसल्या नाहीत. तसेच कोविडच्या दुसऱ्या लाटेतही चटर्जी मतदारसंघात गायब होत्या. त्याचप्रमाणे चक्रीवादळ ‘आराम ‘ दरम्यान सुद्धा त्या फिरकल्या नाहीत. लोकसभा मतदारसंघातील पांडुआ भागात त्या फार कमी वेळा गेल्या होत्या. त्यामुळे ही बाब सध्या देशभरात चर्चेची ठरत आहे.