नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना टाकण्यात आलेल्या शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचारी यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देणेबाबत निर्णय शासनाने घेतलेला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे.
आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने शासनाकडून अहवाल मागवण्यात आला. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर व आरोग्य अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांचा यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार देवयानी फरांदे यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास नाशिक महानगरपालिकेला भाग पाडले होते. महानगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महानगरपालिका अंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचारी यांचे पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तसेच या शासन निर्णयात अग्निशामक पथकासमोर नेमणूक करताना पदास जोखीम भत्ता म्हणून देण्यात आलेले पाचशे रुपये वाढवून ही रक्कम पाच हजार करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे.
आज आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी यांनी आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. व त्यांनी केलेल्या मदतीबाबत त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी आपण यापुढील काळात देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत त्या त्यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुनील फरांदे, दर्शन बलसाने, घनश्याम गायकवाड, विशाल घोलप, विजय थोरात, एकनाथ ताठे, विजय जाधव, संदीप गांगुर्डे, संग्राम साळवे, जितेंद्र परमार, सुशील परमार, जयश रबरीया, शैलेश शिंदे, चिंतामण पवार ,अजय ढोमसे, संजय सोनवणे, सचिन झांझो टे, राहुल तसांबड, संतोष गायकवाड, अनिल गांगुर्डे, विशाल आवारे. आदींसह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते