इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक राजकीय नेत्यांची मुले ही स्वतःला इतरांपेक्षा खास आणि वेगळे समजतात, त्यांच्या वर्तनामध्ये उद्दामपणा, बेफिकीरी तर असतेच, या शिवाय दादागिरी करण्याचे त्यांचे वर्तन असते, त्यातूनच समाजातील अन्य घटकांना त्रास देण्याची त्यांची मानसिकता असते. स्वतः चुकीचे वर्तन केल्यानंतरही आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. याचा प्रत्यय अनेकदा येतो. कर्नाटकात नुकताच असाच प्रकार घडला.
भाजप आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. ट्रॅफिक सिग्नल तोडल्याबद्दल पोलिसांनी तिला थांबवले, त्यानंतर तरुणीने धाक दाखवत रस्त्यावर भयंकर तमाशा करायला सुरुवात केली. मात्र, पोलीस कर्मचार्यांनी मुलीला 10 हजारांचा दंड ठोठावून तिचे सर्व भ्रम दूर केले.
Watch: BJP MLA Aravind Limbavali's daughter abuses cops, media after flouting traffic rules | #ITVideo pic.twitter.com/BvieHCkxYa
— IndiaToday (@IndiaToday) June 10, 2022
विशेष म्हणजे हे प्रकरण बंगळुरूमधील राजभवनाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू कारमधून तिच्या मित्रांसोबत कुठेतरी जात होती. यादरम्यान तिने लाल दिव्याकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे निघाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला रोखले आणि दंड ठोठावण्याबाबत सांगितले.
पोलिसांनी थांबवल्यानंतर तरुणी कारमधून बाहेर पडली आणि रस्त्यात तिची पोलिसांशी झटापट झाली. मुलीने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरापरसनसोबतही गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. हा वाद घालताना वडील आमदार असल्याचा गर्वही तिने दाखवला आणि सर्व गाड्या थांबवण्याची धमकीही दिली.
यादरम्यान राजभवनाकडे जाणारा रस्ताही रोखण्यात आला. मात्र, पोलिसांनी मुलीचा आवाज न ऐकता तिच्यावर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर ती मुलगी म्हणाली, तिच्याकडे पैसे नाहीत, म्हणून तिला जाऊ द्यावे. मात्र पोलिसांनी ते मान्य केले नाही, त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तिच्या मित्राने दंड भरला. तेव्हा कुठे पोलिसांनी तिची सुटका केली.