नाशिक – सिडको परिसरातील श्रीराम नगर येथे विधवा महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी ठिय्या आंदोलन करणे भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. संशयित गुन्हेगाराला अटक करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आमदार सिमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका छाया देवांग , प्रतिभा पवार, अलका अहिरे, कावेरी घुगे , नगरसेवक मुकेश शहाणे, हर्षा फिरोदिया, जगन पाटील, अविनाश पाटील, शिवाजी नाना बरके, राकेश ढोमसे , डॉ वैभव महाले, अँड अतुल सानप, राहुल गणोरे, किरण गाडे, उत्तम काळे, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील आदींनी अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. संशयित गुन्हेगारास अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. सध्या कोरोना निर्बंध लागू असल्याने त्याची दखल घेत पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आमदार हिरे यांच्यासह ठिय्या आंदोलन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.