नाशिक – गेल्या काही दिवसापासून भाजप व मनसे युतीची चर्चा सुरु असतांना उद्या भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील हे मुंबई येथे सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेणार आहे. नाशिक येथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यावेळेस त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती. यावेळी माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे राज ठाकरे यांनी पाटील यांना सांगितले होते. त्याची लिंकही ते पाठवणार असल्याचे त्यावेळी ठरले. पण, त्या लिंकबाबत नंतर वेगवेगळे वृत्त आले. आता ही भेट होत असल्यामुळे पुन्हा युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.
नाशिकला पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची माहिती पत्रकारांनाही दिली. ते त्यावेळेस म्हणाले की, राज ठाकरेंसोबत फक्त हवापाण्याच्या गप्पा नाही मारल्या. त्यांच्यासोबत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. राज आणि माझी जुनी मैत्री, आज सदिच्छा भेट झाली. पण, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मनसेसोबत युती करण्याबाबत पक्षात मंथन करावं लागेल. आम्ही अन्य छोट्या संघटनांना मंत्रीपद देऊ शकतो, तर राज ठाकरे हे तर मोठे नेते असे सांगितले होते. पण, आता ही भेट होणार असल्यामुळे त्यात निश्चितच राजकीय चर्चा होणार आहे. भाजपने मनसेबरोबर युती केली तर त्याची मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या भेटीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.