मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागांवर विजयाचे लक्ष्य निश्चित करून ‘महाविजय संकल्प २०२४’ अभियान जाहीर केले आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट युतीत लढून हा विजय मिळवेल, असे भाजपने जाहीर केले आहे. पण, त्याचवेळी स्वबळाचीही भाषा वापरली जात आहे. राजकीय जाणकार हा शिंदे गटासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानत आहेत.
राज्यात मुख्यमंत्री शिंदे असले तरी सरकार भाजपच चालवित असल्याचे दिसून येते. शिंदे गटाकडे ४० आमदार आणि १३ खासदार आहेत. पण, केंद्रात अद्याप वाटा मिळू शकला नाही. हे संख्याबळ लक्षात घेतले तर शिंदे गटाकडून लोकसभेसाठी १३ – १४ आणि विधानसभेसाठी ६०-७० जागांची मागणी होऊ शकते. पण, ऐवढ्या जागा सोडण्यासाठी भाजप तयार होईल, याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे शिंदे गटालाच तडजोड करावी लागू शकते.
भाजपच्या अंतर्गत हालचाली?
भाजपने २०१४ मध्ये राज्यात १२२ जागांचा टप्पा गाठला होता. कायम इलेक्शन मोडवर असणाऱ्या भाजपने आता लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. आतापासूनच मतदान केंद्र निहाय कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक येथील प्रदेश कार्यकारिणीत बोलताना ‘शत प्रतिशत भाजप’ च्या घोषणेचा जुना संदर्भ आपल्या भाषणात दिला. यावरून भाजप आपल्या जागा कमी करण्याची शक्यता फारच कमी असल्याचे राजकीय जाणकार मानतात.
कमळाचा आग्रह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्याकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर महापालीकेच्या गत निवडणुकीत भाजपने सहकारी पक्षांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हाच कित्ता गिरवित कमळ चिन्हावर अधिकाधिक उमेदवार निवडून आणून स्वबळावर सत्ता मिळविण्याचे लक्ष्य भाजप गाठू शकते.
BJP Mahavijay Campaign Politics Strategy Shinde Group