मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारण बदलले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत वेगवेगळ्या नेत्यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता राज्यातील आगामी घडामोडींवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत महत्त्वाचे विधान केले आहे. येत्या काळात राज्यात आश्चर्यकारक घटना घडणार असून भाजपा आणि शिंदे गटात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या काही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे म्हणणे त्यांचे कार्यकर्ते ऐकतील का, उद्धव टाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं तर तुम्ही पाहातच आहेत. उद्धव ठाकरे गटातील नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहात. त्यामुळे आगामी काळात दाणादाण उडणार आहे. २०२४ पर्यंत पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत. तुम्हाला आश्चर्य होईल, अशा व्यक्ती आमच्याकडे येणार आहेत. या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
ठाकरे गटाकडून प्रयत्न
एकनाथ शिंदे गटाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात यवतमाळमधील दिग्गज नेते संजय देशमुख यांनी प्रवेश केला. शिंदे गटातील नेते तथा मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय देशमुख यांना बळ दिले जाणार आहे. अशाच पद्धतीचे राजकीय डावपेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आखले जात आहेत. ठाकरे गटातील नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करून स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
BJP Maharashtra President Bawankule Politics Upcoming Days